धक्कादायक ! जादूटोण्यासाठी वाघांच्या ‘त्या’ अवयवांची तस्करी ; चौघांना अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – काळी जादू आणि जादूटोणा करण्यासाठी वाघांच्या अवयांची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार रामटेक येथे समोर आला आहे. याप्रकरणी नागपूरमध्ये वनविभागाच्या पथकाने चौघांना अटक केली आहे.

रामदास चव्हाण, तारासिंग राठोड, संदिप नायक, हरिपाल नायक अशी चौघांची नावे आहेत.

सर्वजण पेंच व्याघ्र प्रकल्पात राहणारे

रामटेक येथील राम मंदिर परिसराजवळ काही जण वाघाचे अवयव घेऊन येत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. ते सर्वजण महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील पेंच व्याघ्र प्रकल्पात राहण्यास आहेत.

पेंच राष्ट्रीय उद्यानात लपवून ठेवले अवयव

त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडील दुचाकीमधून पथकाला वाघाच्या मिशीचे केस मिळून आले. त्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर त्यांनी पेंच राष्ट्रीय उद्यानात वाघाचे अवयव पुरुन ठेवले असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने त्यांना घेऊन पेंचच्या जंगलात जाऊन ते ठिकाण पाहिले आणि तेथे खोदकाम केले. त्यावेळी तेथून जमीनीत पुरुन ठेवलेल्या वाघाच्या हाडांसह इतर अवयव जप्त केले. त्यासोबतच तेथून एकाला अटक केली.

जादूटोणा आणि काळ्या जादूसाठी वापर

अटक केलेल्यांकडे चौकशी केल्यावर वाघाचे हे अवयव काळी जादू आणि जादूटोणा करण्यासाठी करण्यासाठी वापरले जात असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेले हे अवयव नेमके वाघाचेच आहेत का? हा वाघ कोणता होता? नर होता की मादी? त्याचा मृत्यू कधी झाला ? याची माहिती फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर समोर येणार आहे.