… तर मी कधीही शिवबंधन सोडू शकतो, ‘या’ माजी मंत्र्याची पक्ष नेतृत्वावर ‘उघड’ नाराजी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिवसेनेतील अनेक दिग्गज नेते नाराज असल्याचे समोर आले. रामदास कदम, दिपक केसरकर, दिवाकर रावते अशा नेत्यांचा मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. शिवसेनेच्या कोट्यातून 15 मंत्रिपदापैकी 3 मंत्रिपद घटकपक्षांना देण्यात आली. त्यामुळे राजकीय घडामोडीत काही बदल झाले. या दरम्यान शिवसेनेचे नाराज माजी आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी पक्ष नेतृत्वावरील नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

दिपक सावंत नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, सध्या तरी महाविकासआघाडीत सर्व काही अलबेल असल्याचे वाटत आहे, मंत्रिमंडळ विस्तार देखील नुकताच झाला आहे. या सर्वांना दालनं देखील मिळाली आहेत. परंतु मागील जानेवारी महिन्यापासून माझ्याकडे कोणतेही काम नाही. राजकारणात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला मिळत नाही. जानेवारीपासून मला कोणतंही काम मिळालं नाही. मी कामासाठी भुकेला आहे, मी काम देखील मागितलं होतं, पण कदाचित उद्धव ठाकरेंच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला काम दिलं नाही.

मी सध्या शिवसेनेचा नेता नाही, उपनेता नाही, विभागप्रमुखही नाही. माझ्या हातात फक्त शिवबंधन आहे आणि मी शिवसैनिक आहे. पक्षाला माजी गरज नसेल तर मला सांगावे, मी समाजसेवा करु शकतो. परंतु दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा निर्णय आता नाही. उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मी निर्णय घेईल असेही दिपक सावंत यांनी सांगत शिवसेना सोडण्याची तयारी असल्याचे दर्शवले.

शिवसेनेत अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक असताना त्यांनी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे पक्षातील आमदार नाराज आहेत. मंत्रिमंडळात समावेश न झालेले शिवसेनेचे नाराज आमदार संजय शिरसाट यांनी देखील मंगळवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आपली नाराजी बोलून दाखवली. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधवांनी देखील मंत्रिपद न मिळाल्याने आपली नाराजी उघड केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/