#MainBhiChowkidar : म्हणून पंकजा मुंढेंनी नावापुढील ‘चौकीदार’ शब्द हटवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्यामुळे ‘मै भी चौकीदार’ या संकल्पनेला त्रास होऊ नये म्हणून, माझ्या नावासमोरील ‘मीही चौकीदार’ हा टॅग काढून टाकला, असे पंकजा मुंढे यांनी म्हंटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या ‘चौकीदार चोर है’ या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर स्वतःच्या नावापुढे ‘मै भी चौकीदार’ हे नाव टाकून उत्तर देण्यात आले. दरम्यान, पंकजा मुंढेंनी सुद्धा ‘मीही चौकीदार’ असे टाकले होते. मात्र, काही काळानंतर त्यांनी ते काढून टाकले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचे म्हणत मोदींवर चोरीचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी ‘चौकीदार चोर है’ चा नारा दिला होता. त्यावेळी भाजपने ‘हॅशटॅग मै भी चौकीदार’ (#MainBhiChowkidar) मोहीम सुरु केली. त्यावेळी भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा स्वतःच्या नावाच्या आधी चौकीदार हे नाव लावण्यात आले. त्याच प्रमाणे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनीसुद्धा आपल्या नावाच्या आधी ‘मी ही चौकीदार’ लावले. मात्र, काही काळाने ते काढून टाकण्यात आले.

पंकजा मुंडेंनी ते नाव का काढून टाकले असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर पंकजा मुंडेंनी त्याचा खुलासा केला आहे. माझ्यासाठी एक प्लॅन्टेड वर्ग सोशल मीडियावर बसलेला असतो. मी काय ऍक्टीव्हिटी करते हे तो वर्ग पाहात असतो. जेव्हा तुम्ही प्रमुख नेत्या म्हटलात, तेव्हा मोदीजींच्या या संकल्पनेला कॅम्पेन अफेक्ट होऊ द्यायचा नाही. त्यामुळे मी ते नाव हटवले. मी एखादी गोष्ट म्हंटली आणि ती गोष्ट १० टक्के लोकांना जरी नाही पटली, तर मी त्याचा विचार करते. त्यामुळे या कॅम्पेनवर विनाकारण चुकीचा परिणाम होऊ नये, याची काळजी घेण्याचा प्रयत्न मी केला, असे त्यांनी स्पष्ट केले.