चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासारखा दिसण्याचा जबरदस्त फटका, काय झालं जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनचे प्रसिद्ध ओपेरा सिंगर लिउ केकिंग यांचा चेहरा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी मिळताजुळता आहे. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 63 वर्षीय लिउ केकिंग बर्लिनमध्ये राहतात, पण ते ओपेरा गातानाचे अनेक व्हिडिओ टिकटॉकवर सतत अपलोड करत असतात. टिकटॉकवर त्यांचे 41 हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत. टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासही त्यांना मनाई करण्यात आली आहे.

शिवाय त्यांचे सोशल मीडियावरील अकाउंट अनेकदा बंद करण्यात आले आहे. दुसरे अकाउंट बनवल्यानंतर तेही थोड्यावेळानंतर डिलीट झाले असे त्यांनी सांगितले. माझ्या आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चेहर्‍यात साम्य आहे, त्यामुळे माझे सोशल मीडियावरील अकाउंट बंद केले आहे. मी अनेकदा माझी ओळख, माहिती चीन सरकारला दिली आहे. आता अकाउंट पुन्हा सुरू होण्याची वाट बघतोय असे लिउ म्हणाले. राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीष्ठेचे कारण देत उचललेल्या अनेक पावलांवरुन चीनवर यापूर्वीही अनेकदा टीका झाली आहे. लिउ यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर निर्बंध घातल्याने चीनवर पुन्हा एकदा जोरदार टीका होत आहे.