बोगस फॉलोवर्स प्रकरणी बॉलिवूडमधील 100 ते 150 अभिनेत्री चौकशीच्या फेऱ्यात !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : एका बड्या मार्केटींग कंपनीवर 49 मिलियन युजर्सचा डेटा लीक केल्याचा आरोप असून बोगस फॉलोवर्स प्रकरणी ही कंपनी मुंबई क्राईम ब्रँचच्या रडारवर आहे. दोन आरोपींना या प्रकरणी अटकही झाली आहे. मार्केटींग कंपनीचे सीईओ आणि त्याच्या पत्नीसह अद्याप 15 ते 18 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड आणि टीव्हीमधील 100 ते 150 अभिनेत्री चौकशीच्या फेऱ्यात आहेत. यात बॉलिवूडच्या 2 दिग्गज अभिनेत्रींचा समावेश असल्याचं पोलिसांच्या सूत्रांकडून समजत आहे.

एका मार्केटींग कंपनीनं गेल्या वर्षी इंस्टाग्राम युजर्सचा डेटा लीक केल्याचं प्रकरण उघड झालं होतं. या कंपनीनं तब्बल 49 मिलियन युजर्सचा डेटा लीक केला आहे असा कंपनीवर आरोप आहे. या प्रकरणी दीड डझनहून अधिक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत तर दोघांना अटक झाली आहे. बॉलिवूडमधील 150 दिग्गज लोक चौकशीच्या फेऱ्यात असल्याची माहिती आहे. यात दोन प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींचा समावेश आहे असंही क्राईम ब्रँचनं सांगितलं आहे.

गायिका भूमी त्रिवेदी आणि अभिनेत्री कोनिका मित्रा यांनी क्राईम ब्रँचकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. ही एक पीआर एजन्सी असू शकते. या कंपनीनं अनेकांना खास करून बॉलिवूडमधील दिग्गजांना बोगस फॉलोवर्स मिळवून दिले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही नुकतंच असं सांगितलं होतं की, बोगस फॉलोवर्सच्या माध्यमातून बॉलिवूडची काही लोकं प्रसिद्धी करतात. डेटाची चोरी ट्रोलिंग या अंगानंही या प्रकरणाचा तपास केला जात आहे.