सोर्सकोड चोरून सॉफ्टवेअर विकणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेतीमालाच्या आडत व्यवसायासाठी आणि खरेदी विक्रीसाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरचा सोर्सकोड आणि पासवर्ड चोरून एका तथाकथित सॉफ्टवेअर व्यावसायिकाने ते सॉफ्टवेअर ३०० जणांना विकले. शहर व परिसरातील अनेक व्यवसायिकांची त्याने फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. शहरातील नामांकित हॉटेल, लॉन्ड्री, शीतपेय व्यवसायिकांना ते विकल्याचे मार्केटयार्ड पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी किशोर कुंजीर (वय ४९, रा. एनआयबीएम) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश जेवरे (वय ४२, रा. कुदळे पाटील टाऊनशिप, माणिकबाग, सिंहगड रोड) याला २९ मार्च रोजी अटक करण्यात आली. शनिवारी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजीर आडत व्यवसायिक असून त्यांनी व्यवसायासाठी १९९५ मध्ये सॉफ्टवेअर तयार करून घेतले. जेवरे याने २००७ मध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करून देतो असे सांगितले. त्यासाठी कुंजीर आणि जेवरे यांनी करार केला. जेवरे याने कुंजीर यांच्या संगणक प्रणालीचा सोर्सकोड व व्यावसायिक स्थित्यंतरांची माहिती, बदल यांची चोरी केली.

कुंजीर यांचे सॉफ्टवेअर स्वतःचेच आहे, असे भासवून जेवरेने पुणे तसेच बारामती, जुन्नर येथील बाजार समितीमधील आडते व व्यापाऱ्यांसोबतच सुजाता कोल्ड्‌क्‍स, डिलक्‍स ड्रायक्‍लिनर्स, हॉटेल शुभम, वेदांत प्युअर व्हेज, शिवराज कोल्ड स्टोरेज, चंद्रमा रेस्टॉरंट आदींना त्याची विक्री केली.

या बाबत कुंजीर यांनी पोलिस आयुक्तालयात सायबर सेलमध्ये तक्रार केली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास मार्केटयार्ड पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. पोलिसांनी जेवरेच्या अप्पा बळवंत चौकातील ऑफिसची झडती घेतली. त्यावेळी हे सॉफ्टवेअर विकलेल्या 300 जणांची नावे सापडली, अशी माहिती मार्केटयार्ड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी निंबाळकर यांनी दिली.