‘कोरोना’ विषाणूबाबत ‘समुपदेशन’ करणाऱ्या नर्सची ‘वाहने’ जाळली

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या एक नर्स आणि तिच्या पतीची गाडी समाजकंटकांनी जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही नर्स परिसरातील मैदानात खेळणाऱ्या मुलांना कोरोना विषाणू हा संसर्गजन्य रोग आहे. तो संपर्कामुळे होतो, असे वारंवार सांगत होती. त्यावेळी या मुलांनी त्यांना दमदाटी केली. या प्रकारानंतर वाहने जाळण्याची घटना घडल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सुरेखा पुजारी असे या नर्सचे नाव असून त्या कुंभारी येथील विडी घरकूल येथे रहात असून मार्कंडेय रुग्णालयात कार्यरत आहेत. सुरेखा पुजारी रहात असलेल्या घरासमोरील मोकळ्या मैदानात रोज 8 ते 10 मुले खेळत असतात. या मुलांना कोरोनापासून सावध करण्यासाठी पुजारी रोज हटकत होत्या. आपल्याकडे कोरोनाचे 12 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तुम्ही एकत्र खेळू नका. हा संसर्गजन्य रोग असून तुम्ही तुमची काळजी घ्या, असं त्यांना काल दुपारी मुलांना समजावून सांगितले.

मात्र, मुलांना त्यांचे ऐकून न घेता त्यांना उलट उत्तरे दिली. तुम्ही दररोज मार्कंडे्य रुग्णालयात जाता. मग तुमच्यामुळेच कोरोना येत नाही का ? असा उलट प्रश्न विचारत त्यांना तुम्हाला बघून घेऊ अशी दमदाटीही केली. त्यामुळे सुरेखा पुजारी यांनी कुंभारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आज सकाळी त्यांना त्यांच्या घराबाहेरील दोन्ही गाड्या जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या. पुजारी यांची मेस्ट्री आणि पतीची हिरो होंडा दुचाकी अज्ञातांनी रात्री जाळली.

घडलेल्या प्रकाराची तक्रार करण्यासाठी पुजारी या कुंभारी पोलीस ठाण्यात गेल्या. परंतु कुंभारी पोलिसांनी त्यांना वळसंग पोलीस ठाण्यात जाण्यास सांगून त्याठिकाणी तक्रार नोंदवण्यास सांगितले. पुजारी यांनी वळसंग पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.