मुंबई अन् पुण्यात सूर्यग्रहण पाहण्यासाठी संधी, जाणून घ्या कधी आणि कसे

पोलिसनामा ऑनलाईन – रविवारी दि. 21 जून रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. देशातील काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही भागांतून खंडग्रास दिसणार आहे. संपूर्ण आयुष्यात क्वचितच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळते. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. अशी माहिती खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून हे ग्रहण खंडग्रास दिसणार आहे.

मुंबईतून रविवार दि. 21 जून रोजी सकाळी 10 वाजून 01 मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी ग्रहणमध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीत जास्त सुमारे 70 टक्के ग्रासित दिसेल. दुपारी 1 वाजून 28 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. महाराष्ट्रात सध्या अभ्राच्छादित आकाश आहे. परंतू मध्येच दुपारी सूर्यदर्शन होते. त्यामुळे सूर्यग्रहणाचे निरीक्षण करता येईल अशी आशा खगोलप्रेमीना वाटत आहे. असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले. पुणे येथून सकाळी 10-03 ते दुपारी 1-31, नाशिक येथून सकाळी 10-04 ते दुपारी 1-33, नागपूर येथून सकाळी 10-18 ते दुपारी 1-51 , औरंगाबाद येथून सकाळी 10-07 ते दुपारी 1-37 यावेळेत हे सूर्यग्रहण दिसेल, असेही ते म्हणाले. 21 तारखेला दिसणार्‍या सूर्यग्रहणाची वेळ रविवार, 21 जून रोजी सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी तेथे सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. दुपारी 12 वाजून 1 मिनिटांपासून 12 वाजून 2 मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. दुपारी 1 वाजून 48 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल, असे पंचांगकर्ते सोमण यांनी सांगितले.