‘महाविकासमधील काही मंत्रीच उध्दव ठाकरेंची दिशाभूल करताहेत’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी ‘आपली आर्थिक भागीदारी असलेल्या दूध पावडर कंपन्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील काही घटक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत असल्याचा’ आरोप केला आहे. परिणामी मुख्यमंत्र्यांनी यात स्वतः लक्ष घालून तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत आहे.

यासंदर्भात बोलताना डॉ. अजित नवले म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे कारण सांगत दुधाचे खरेदी दर कमी करण्यात आले. तथापि, ग्राहकांना प्रत्यक्षात विकण्यात येणाऱ्या दुधात कोणत्याही प्रकारची दर कपात करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांची लूट करुन मधले घटक पैसे कमवतात. ही लूट थांबवण्यासाठी संघर्ष समिती सतत आंदोलन करत आहे. पण सत्तेत सामील असलेल्या अनेकांचे हितसंबंध दूध कंपन्या व दूध संघात गुंतलेले असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.’

‘महाराष्ट्रात सद्य परिस्थितीत ५५ हजार टन दूध पवडर पडून आहे. तसेच प्रतिदिन २ लाख लिटर दूध अतिरिक्त होत आहे. अशा काळात राज्य सरकारमार्फत महिन्याला केवळ ४५० टन दूध पावडर गरिबांना वितरित करुन प्रश्न सोडवल्याचा आव आणत आहेत. सरकार दूध प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे हे द्योतक असून, सरकारमधील सामील असलेल्या काही घटकांचे हितसंबंध दूध व्यवसायात व शेतकऱ्यांच्या, ग्राहकांच्या लुटीत सामावल्याने त्यांच्याकडून या प्रश्नांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे’, डॉ. नवले यांनी सांगितलं.