‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मधील ‘या’ कलाकाराला सोनू सूदची मदत

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना सुखरुप घरी पोहोचवण्याचे काम अभिनेता सोनू सूद करत आहे. नुकतीच त्याने अडचणीत सापडलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील एका कलाकाराचीही मदत केली आहे. अभिनेते सुरेंद्र राजन हे एका वेब सीरिजच्या शूटिंगनिमित्त मार्च महिन्यात मुंबईत आले होते. मात्र लॉकडाउनमुळे त्यांना पुन्हा घरी जाता आले नाही. त्यांच्याकडे असलेले पैसेसुद्धा संपले होते.

अशा वेळी सोनू सूदने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.सोनू सूदला राजन यांच्याविषयी समजले तेव्हा 18 जूनच्या आधी त्यांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याचे आश्वासन त्याने दिले आहे. या मदतीविषयी राजन म्हणाले, सोनू सूदचे काम अविश्वसनीय आहे. त्याच्या या कामाने मीच आश्चर्यचकित झालो आहे.

लोकांना मदत करण्याची इच्छा मनापासून असल्याशिवाय कोणी हे काम सातत्याने करू शकत नाही. त्याच्यासारखे लोक खूप कमी भेटतात. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये काम केल्यापासून संजय दत्तच्या संपर्कात असल्याचेही राजन यांनी सांगितले. मात्र कोणावरही अवलंबून राहू नये म्हणून संजय दत्तकडे मदत मागितली नाही. सुरेंद्र राजन यांच्याकडे असलेले सर्व पैसे संपले असून घराचे भाडे देण्यासाठीही पैसे नाहीत. या कठीण काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही अन्नधान्य पुरवल्याची माहिती त्यांनी दिली.