‘…म्हणून तुला खास सायकलवरुन भेटायला येईन’ ! सोनू सूदला चाहत्याची ‘साद’

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना कालावधीत अभिनेता सोनू सूद मजुरांच्या मदतीसाठी उभा राहिला आहे. लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे, तरीदेखील एकही दिवस सुट्टी न घेता सोनू सूद आणि त्याची टीम सतत मदतकार्य करत आहे. आतापर्यंत सोनूने हजारोंच्या मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवले आहे. त्यामुळे अनेकांसाठी हिरो झालेल्या सोनू सूदचे प्रत्येक जण आभार मानत आहे. यामध्येच बिहारच्या एका मुलाने लॉकडाउन संपल्यानंतर खास सायकलवरुन बिहार -मुंबई असा प्रवास करुन भेटायला येईल असे सांगितले आहे.

मुजफ्फरपूरमधील धीरज कुमार याने ट्विट करत सोनूला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्याने मुजफ्फरपूर ते मुंबई असा प्रवास थेट सायकलवरुन करणार असल्याचे सांगितले आहे. धीरज कुमारचे ट्विट पाहिल्यानंतर सोनूने त्याला लगेच रिप्लाय दिला आहे. आता सायकल आणि पायी प्रवास करण्याचे दिवस गेले मित्रा. आता मीच तिकडे येईन आणि तू मला तुझ्या सायकलवर बसवून पूर्ण मुजफ्फरपूर फिरव, असा रिप्लाय सोनूने धीरजा दिला. दरम्यान, सोनूचे हे उत्तर वाचून अनेकांनी त्यांचे कौतूक केले आहे. एक सेलिब्रिटी असूनही तो सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्यातलाच एक होऊन राहतो असे अनेकांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद रस्त्यावर उतरुन नागरिकांना मदत करीत असल्यामुळे नेटकर्‍यांकडून कौतुक केले जात आहे.