प्रत्येक जिल्ह्यात ‘हेलीपोर्ट’चा निर्णय लवकरच : डॉ. विश्वजीत कदम

सांगली :  पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. यंदाही वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिला असून महापुराचा सामना करण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नदी काठावरील गावांना चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा पडल्याने नागरिकांना मदत पोहचवता आली नाही. पूरग्रस्तांना वेळीच मदत पोहचावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विमानतळाच्या धर्तीवर हेलीपोर्ट असावे असा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली.

सिंचन योजनांचे तलाव भरणार

याच पत्रकार परिषदेत डॉ. विश्वजीत कदम यांनी असे ही सांगितले की, पूरस्थिती रोखण्यासाठी कोयना धरणातील पाणीसाठा कमी करून दुष्काळी भागातील सिंचन योजनांचे तलाव भरून घेतले जातील. जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य महापूराच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या आढावा बैठकीनंतर सहकार राज्यमंत्री डॉ. कदम बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे सीईओ अभिजित राऊत उपस्थित होते.

पावसाळ्यात कोरोना प्रादुर्भाव वाढून नये याची खबरदारी

आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आगामी पावसाळा, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज आढावा घेण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव पावसाळ्यात वाढू नये याची खबरदारी घेतली आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये महापुराने थैमान घातले होते. पाच-सहा दिवसात झपाट्याने पाणी वाढल्याने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. कृष्णा, वारणा काठच्या 104 गावांना पुराच्या पाण्याने वेढले होते. घरांची पडझड, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेक प्राण्यांना देखील प्राणाला मुकावे लागले. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत मदत देण्यात अडचणी निर्माण झाल्या. यामुळे हेलीपोर्ट सुरु करणार.

पूरस्थितीत जवानांना पाचारण केले मात्र, त्यांचे हेलकॉप्टर उतरवण्यासाठी कसरत करावी लागली. त्यामुळे ज्या ठिकाणी विमानतळ नाही. त्या ठिकाणी विमानतळाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात हेलीपोर्ट सुरु करण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
87 नवीन बोटींची खरेदी

पुढे बोलताना डॉ. कदम म्हणाले, महापुराचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद आणि प्रशासनाकडून 87 बोटींची खरेदी करण्यात येणार आहे. त्या लवकरच उपलब्ध होणार आहेत. तसेच पतंगराव कदम यांच्या नावाने आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी उभा केला आहे. यातूनच या बोटींची खरेदी करण्यात येणार आहे. लाईफ जॅकेट्स, बॅग, मेगा फोन, बॅटरी, दोऱ्या आदींसह किट्स पूर पट्ट्यातील ग्रामपंचायतींना देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.