‘कोरोना’चा धोका असताना ‘हा’ देश IPLचे आयोजन करण्यास ‘उतावीळ’, BCCI ला पाठवला ‘प्रस्ताव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकडाऊनचा कार्यकाळ देखील वाढवण्यात आला आहे. अशा स्थितीत क्रिकेट विश्वातील लोकप्रिय स्पर्धा आयपीलचा २०२० चा सामना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. अशा परिस्थितीत एका देशाने मात्र आम्ही आयपीएल सामना आयोजित करू असा प्रस्ताव बीसीसीआयकडे पाठवला आहे.

हा देश दुसरा -तिसरा कोणी नसून श्रीलंका आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (एसएलसी) शम्मी सिल्व्हा यांनी असा प्रस्ताव पाठविला की, त्यांचे बोर्ड बीसीसीआयला आयपीएल 2020 आयोजित करण्यासाठी संपूर्ण सुविधा देण्यास तयार आहे. श्रीलंकेत कोरोना विषाणूची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत आणि येथे केवळ 7 लोक मरण पावले आहेत.

बीसीसीआय ने पुढे ढकलली स्पर्धा

भारतात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खेळाडू आणि लोकांचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. बीसीसीआय, फ्रँचायझी मालक, प्रसारक, प्रायोजक आणि सर्व संबंधित संघटनांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आहे की जेव्हा परिस्थिती सुरक्षित असेल तेव्हाच आयपीएलचा हा हंगाम खेळला जाईल. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत राहू. यानंतर लगेच एसएलसीचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी श्रीलंकेत आयपीएल 2020 आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला.

बीसीसीआय कडून अद्याप निर्णय नाही

शम्मी सिल्वा यांनी, आयपीएल 2020 रद्द केल्यास बीसीसीआय आणि त्याचे भागधारकांचे हजारो कोटींचे नुकसान होईल. परिणामी, बीसीसीआयने ते 2009मध्ये दक्षिण आफ्रिकेत ठेवल्यामुळे ते रद्द करण्याऐवजी ते दुसर्‍या देशात आयोजित करणे फायद्याचे ठरेल, असे सांगितले. या प्रकरणात अद्याप बीसीसीआयकडून कोणतीही माहिती आलेली नाही. यासाठी आधी श्रीलंकेतील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यात येणार आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयपीएल 2020 आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला असला तरी, बीसीसीआयला ते स्वीकारणे आता सोपे होणार नाही. बीसीसीआय कोरोना विषाणूच्या साथीमुळे क्रीडापटू आणि लोकांचे जीवन धोक्यात घालण्यास तयार नसेल. सध्या बर्‍याच देशांमध्ये प्रवासी निर्बंध घातले गेले आहेत, त्यामुळे खेळाडूंची उपलब्धता अवघड होईल. परिस्थिती सुधारल्यानंतरच यावर काही निर्णय घेतला जाईल.