निवडणूक ड्युटीवरील जवानाची आत्महत्या

पटना (बिहार) : वृत्तसंस्था – सीमा सुरक्षा बल (एसएसबी) जवानाने निवडणुकीच्या ड्युटीवर असतना स्‍वत:ला गोळी झाडून घेवून आत्महत्या केली आहे. बिहारमधील हाजीपूर येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. ईश्वर गिरीधर चौधरी असे या जवानाचे नाव असून तो मूळचा महाराष्ट्रातील जळगावचा आहे . ते एसएसबी ६५ बटालियनमध्ये तैनात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या पाचव्या टप्यातील मतदान आज होत आहे. यात हाजीपूरमध्येही मतदान आहे. हाजीपूर जिल्ह्यात एसएसबीचे पथक थांबले आहे. आज हाजीपूर येथे मतदान असल्याने, तिथे रवाना होण्याआधी ईश्वर गिरीधर चौधरी यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

हाजीपूरमध्ये आज मतदान असून, इथे एनडीएकडून लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपती कुमार पारस हे मैदानात आहेत, तर महागठबंधनकडून राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवचंद्र राम उमेदवार आहेत. एकूण ११ उमेदवार हाजीपूरमधून रिंगणात आहेत.