नगर-औरंगाबाद रस्त्यावर एसटीबसमध्ये घुसून चालकाची धुलाई

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – रस्त्यावरून जाताना  कट मारल्याच्या रागातून एसटी अडवून चालकाच्या केबीनमध्ये घुसून बेदम मारहाण करण्यात आली. नगर-औरंगाबाद रस्त्यावरील बीटीआर मिलिटरी कँपसमोर ही घटना घडली.
याप्रकरणी कँप पोलिस ठाण्यात हिरो कंपनीच्या (क्र. एमएच 16, बीडब्ल्यू 6285) दुचाकीस्वाराविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून शासकीय सेवकास मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बसचालक संतोष किसन मानवतकर (रा. चिखला, पिंपरीखंदारे, ता. लोणार, जि. बुलढाणा) याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून  समजलेली माहिती अशी की, संतोष मानवतकर हे जालना एसटी डेपोत चालक म्हणून नोकरी करतात. ते जालना-पुणे एसटी बस घेऊन पुण्याकडे चालले होते. नगर-औरंगाबाद रस्त्याने येत असताना त्यांनी एका  दुचाकीस्वाराला कट मारला.  त्यामुळे  संतापलेल्या दुचाकीस्वाराने त्यांचा पाठलाग सुरू केला. बीटीआरसमोर दुचाकीस्वाराने बसला दुचाकी आडवी लावली. त्यामुळे चालकाने बस थांबविली. त्यानंतर दुचाकीस्वार बसच्या केबीनमध्ये घुसला. ‘तुला साईट दिसत नाही का’, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून तोंड व उजव्या बरगडीत बेदम मारहाण केली. ‘तू जास्त नाटक केली, तर मारून टाकीन’, अशी धमकी दिली.

बरगडीत  जोराचा फटका बसल्याने  चालक  किरकोळ जखमी झाला. त्यानंतर खाली उतरून दुचाकीवरून सदर युवक पसार झाला. या प्रकारानंतर बस वाहकाने पोलिसांना कळवले. त्यावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. संतोष मानवतकर यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात किरकोळ औषधोपचार करण्यात आले.

याप्रकरणी कँप पोलिस ठाण्यात एसटीबस चालक संतोष मानवतकर  यांच्या फिर्यादीवरून दुचाकीवरील अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम 353, 341, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.