शिक्षणमंत्र्यांना झाली ‘कोरोना’ची बाधा !

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता महाविकास आघाडीच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या असे ट्विट गायकवाड यांनी केले आहे. धारावीतील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी वर्षा गायकवाड यांनी अविरत प्रयत्न केले आहे. वर्षा गायकवाड लवकर बर्‍या होतील आणि पुन्हा जनेसेवचे काम करतील अशी खात्री असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. मागील पाच दिवसात महाविकास आघाडीच्या चार मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन्ही मंत्र्यांचा कोरोना चाचणी अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर जलसंपदा राज्य मंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची बाधा झाली होती .