खुशखबर ! पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंकडून राज्यातील गड-किल्ल्यांवर आधारीत फोटो आणि व्हिडिओग्राफीच्या स्पर्धाची घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेले गड दुर्ग किल्ले आहेत. महाराष्ट्रात 350 हून अधिक किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाद्वारे 8 ते 22 जानेवारी 2020 या कालावधीत सोशल मीडियाच्या माध्यमावर गड दुर्ग किल्ल्यांवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. यात छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी स्पर्धाचा समावेश असेल.

आदित्य ठाकरे म्हणाले की राज्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांची देश विदेशातील पर्यटकांना ओळख करुन देणे, सर्वसामान्यांमध्ये गड दुर्ग किल्ल्यांबाबत आकर्षण व आवड निर्माण करणे. शिवाय पर्यटक आणि अभ्यागत यांना या गड दुर्गांची ऐतिहासिक माहिती देणे यासाठी स्पर्धाचे आयोजन हा मुख्य उद्देश आहे.

इच्छुक आणि तरुणांमध्ये यामुळे आवड निर्माण होईल आणि त्यांना महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गड – दुर्ग किल्ल्यांना भेट देण्यास प्रोस्ताहीत केले जाईल. पर्यटकांना देखील महाराष्ट्रातील ऐतिहासिक गतवैभव अनुभवता येईल. राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास यासाठी विविध उपक्रम राबविले जातील अशी ही माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

अशी असणार स्पर्धा –
1. या स्पर्धेत व्हिडिओ ग्राफी आणि छायाचित्रण असेल. विशेष म्हणजे ही स्पर्धा खुल्या श्रेणीत आणि व्यावसायिक श्रेणी अशा दोन्ही विभागात असेल. ज्यांनी याची आवड आहे त्यांच्यासाठी खुला गट असेल. ही श्रेणी सर्व स्तरावरील लोकांसाठी असेल. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये आणि 10 विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी 2 हजार रुपयांचे पारितोषिक असेल.

2. स्पर्धेत दुसरी श्रेणी व्यवसायिक असेल. व्हिडिओग्राफी आणि छायाचित्रण अशा तज्ञांसाठी ही श्रेणी असेल. या श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना 25 हजार रुपये आणि 10 विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी 10 हजार रुपयांचे पारितोषिक असेल.

3. व्यावसायिक श्रेणीतील व्हिडिओग्राफी स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक म्हणून 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 75 हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक 50 हजार रुपये. तर 10 विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये पारितोषिकाची रक्कम असेल.

या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील ऐतिहासिक किल्यांबाबत जनजागृती वाढवणे आणि राज्यात देशी विदेशी पर्यटकांची आणि अभ्यागतांची संख्या वाढवणे हा मुख्य हेतू आहे असेही आदित्य ठाकरेंकडून सांगण्यात आले.

हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर #MaharashtraTourismContest आणि #MaharashtraTourism असे पोस्ट करावे लागतील. शिवाय पर्यटन विभागाचे @Maharashtra TourismOfficial हे फेसबूक पेज आणि @MaharashtraTourismofficial हे इंस्टाग्राम पेज फॉलो करण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/