आधी ‘मेड इन चायना’ असलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवा !

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत असून चिनी साहित्यावर बहिष्काराची मागणी वाढत आहे. अशातच आता गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वसावा यांनी भाजपावर निशाणा साधत, ‘जर भाजपा चिनी सामानाचा खरेच विरोध करत असेल तर आधी मेड इन चायना असलेला स्टॅट्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे’ असे म्हटले आहे.

चीन आपला शत्रू असून जर भाजपाचा चीनला खरेच विरोध असेल तर पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ युनिटी हटावावा, कारण तो मेड इन चायना आहे. चीनचा विरोध करायचा असेल तर सुरूवात स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून करायला हवी, असे छोटू वसावा म्हणाले आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील आदिवासी लोकांच्या जमिनी घेण्यासाठी सरकार बळजबरी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. गुजरात सरकार विकासाच्या नावाखाली केवाडियामधील शेतकर्‍यांच्या जमिनी घेण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोपवसावा यांनी केला. केवाडियाच्या परिसरातील 6-7 गावांमधील जवळपास 25 हजार हेक्टर जमीन बळजबरी ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या परिसरातील जमीन अमेरिकी आणि चिनी कंपन्यांना देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी वसावा यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदानापासून दूर राहून गुजरातमधील तीन भाजपा उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता.