चिंताजनक ! राज्यात फक्त 10 ते 12 दिवस पुरेल एवढा रक्तचा साठा

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात कोरोनाच्या भितीपोटी मुंबई, पुणे, नागपूरसह शहरी भागातील रक्तदान शिबिरे ठप्प पडली आहेत. याच्या परिणामी रक्तपेढ्यांमधे होत असून रक्ताच्या पिशव्यांची संख्या वेगाने कमी होऊ लागली आहे. आता केवळ 10 ते 12 दिवस पुरेल एवढाच रक्त साठा राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकार्‍याने सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याला दुजोरा दिला असून लोकांनी गर्दी न करता रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये आजच्या दिवशी 6 हजार 977 रक्ताच्या पिशव्या शिल्लक आहे. रोज साधारणपणे 800 ते 1000 रक्ताच्या पिशव्यांची गरज असते. राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये आजच्या दिवशी 38 हजार 308 रक्ताच्या पिशव्या उपलब्ध आहेत. राज्याची रोजची रक्ताची गरज 4 हजार 500 ते 5 हजारांवर असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकार्‍याने सांगितले. राज्यातील विविध रुग्णालयात होणार्‍या शस्त्रक्रियांसाठी दरमहा सुमारे सव्वा लाख रक्ताच्या पिशव्यांची गरज भासते. 2019 मध्ये ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यामातून 17 लाख 23 हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या होत्या. त्यासाठीी सुमारे 28 हजार रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. राज्यात होणार्‍या एकूण रक्तदान शिबिरांपैकी बहुतेक शिबिरे ही मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आदी शहरी भागात होत असतात. स्वयंसेवी संस्था तसेच राजकीय पक्षांच्या माध्यमातून ही शिबिरे आयोजित करण्यात येत असून करोनामुळे ही शिबिरे जवळपास ठप्प झाल्याचे वेगवेगळ्या रक्त पेढ्यांमधील या शिबिरांचे आयोजन करणार्‍या समाजसेवकांचे म्हणणे आहे.

राज्यात आजघडीला 341 रक्तपेढ्या असून यात 76 सरकारी तर 265 खाजगी व निमशासकीय रक्तपेढ्या आहेत. साधारणपणे राज्यात दरमहा 2500 शिबिरे होत असतात. यातील बहुतेक रक्तदान शिबिरे ही शहरी भागात होत असून आज या शिबिरांची संख्या रोडावली आहे. लोकांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करावे तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजनही करावे. मात्र या रक्तदान शिबिरात एकाच वेळी रक्तदान करण्यासाठी गर्दी होणार नाही याची काळजी घेत 50 ते 100 रक्ताच्या पिशव्या जमा करावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.