परदेशात पलायन करू शकतो सामुहिक बलात्कारातील आरोपी प्यारे मियाँ, लुकआऊट नोटिस जारी, महाराष्ट्र कनेक्शन आलं समोर

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये समोर आलेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात रोज नवनवीन खळबळजनक खुलासे होत आहेत. व्हीव्हीआयपी अंसल अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये राहणारा आरोपी प्यारे मियाने घरातच डान्सबार बनवला होता. प्यारे मियाचे अंसल अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट आहेत. या फ्लॅटवर जेव्हा छापा मारण्यात आला, तेव्हा येथे पोलिसांना डान्सबार सापडला.

येथे रोज रात्री प्यारे मिया आपल्या श्रीमंत मित्रांसाबत पार्टी करत होता. या पार्टीत अल्पवयीन मुलींना दारू पाजून त्यांच्याकडून डान्स करून घेतला जात होता. सोबतच त्यांना चाइल्ड पोर्नोग्राफी संबंधी फिल्म दाखवून आपल्या वासनेची शिकार बनवले जात होते. ही बाब पीडित मुलींनी आपल्या जबाबात सांगितली आहे. प्यारे मियाच्या घरातून रेनडियरची शिंगेसुद्धा मिळाली आहेत. आता याबाबत उत्पादन शुल्क कायदा आणि वन कायद्यांतर्गत सुद्धा कारवाई होईल.

परदेशात पळू शकतो प्यारे मिया
मुलींच्या लैंगिक शोषणातील आरोपी प्यारे मियाच्या ड्रायव्हरला आष्टातून पकडण्यात आले आहे. तेथे त्याच्या साथीदाराने इनोव्हा गाडीत बसवून प्यारे मियाला महाराष्ट्राकडे पाठवले होते. आता पोलीसांची अर्धा डझन पथके भोपाळ, इंदौर आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात त्याचा शोध घेत आहेत. लुकआऊट नोटिस सुद्धा जारी केली आहे, जेणेकरून तो परदेशात पळून जाऊ नये. महाराष्ट्र पोलिसांची सुद्धा मदत घेतली जात आहे.