भाजपा खासदार हेगडेंनी BSNL चे कर्मचारी ‘गद्दार’ असल्याचं सांगितलं, म्हणाले – ‘काम करण्याची नाही इच्छा, सरकार 88 हजार जणांना काढून खासगीकरण करणार’

बेंगुळुरु : वृत्तसंस्था –  भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे आणि यावेळी त्यांचा निशाणा भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या कर्मचाऱ्यांवर आहे, ज्यांना त्यांनी गद्दार देखील म्हटले आहे. ते म्हणाले की, सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलचे कर्मचारी गद्दार आहेत, त्यांना कंपनीचे नाव वाढवण्यासाठीही काम करायचे नाही.

सरकारकडून कर्मचार्‍यांना देण्यात येणाऱ्या व्हीआरएसला याच्याशी जोडत ते म्हणाले की, ८८ हजाराहून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले जावे, कारण सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करेल. हेगडे यांनी हे विधान उत्तरा कन्नड जिल्ह्यातील कुमटा येथे एका कार्यक्रमादरम्यान केले आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री असलेले अनंत हेगडे यांनी अनेकवेळा वादग्रस्त विधानं केली आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपवास आणि सत्याग्रहांना नाटक म्हटले होते. त्यानंतर त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या नाराजीचा सामना करावा लागला आणि पक्षाने त्यांना माफी मागण्यास सांगितले होते.

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने नुकसान भरपाई करण्यासाठी कर्मचार्‍यांना ऐच्छिक सेवानिवृत्तीची संधी दिली आहे. ५० वर्षे पूर्ण केलेल्या किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे बीएसएनएलचे सर्व नियमित व स्थायी कर्मचारी व्हीआरएससाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. कंपनीला अपेक्षा आहे की, सुमारे ८०,००० कर्मचारी व्हीआरएस निवडू शकतात. महानगर टेलिफोन निगम लिमिटेडनेही (एमटीएनएल) आपल्या कर्मचार्‍यांना हा पर्याय दिला आहे.