Coronavirus : जापाननं ‘लॉकडाऊन’ शिवाय जिंकली ‘कोरोना’विरूध्दची लढाई, ‘रेस्टॉरंट-सलून’ उघडे असताना देखील झालं शक्य, जाणून घ्या

टोकियो : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जग बेजार झाले आहे. मात्र, जपान अगदी सहजतेने हे युद्ध जिंकण्याच्या जवळ पोहचले आहे. ना लॉकडाउन, ना वर्दळीवर खास प्रतिबंध, एवढेच नव्हे तर रेस्टॉरन्ट आणि सलूनदेखील उघडे होते. मोठ्या संख्येने टेस्टसुद्धा केल्या नाहीत, तरीसुद्धा त्यांनी संसर्गाचा वेग थांबवण्यात यश मिळवले आहे. विकसित देशांमध्ये कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला असताना, जपानमध्ये केवळ 808 लोकांनी आतापर्यंत आपले प्राण गमावले आहेत. जपान मोठ्या देशांपैकी पहिला असा देश आहे ज्याच्याजवळ अशा प्रकारच्या आजाराला तोंड देण्यासाठी सीडीसी सारखे कोणतेही रोग नियंत्रण केंद्र नाही. तरीही तो यशस्वी ठरला आहे.

होक्काइडोच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात संसर्ग नियंत्रण विभागाचे प्राध्यापक प्रोफेसर योको त्सुकामोटो म्हणतात, आमची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था या केंद्रापेक्षा मजबूत आहे. तर प्रोफेसर काजुटो सुझुकी म्हणतात, ही सिंगापूरसारखी अ‍ॅप प्रणाली नाही, तर नागरिक आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या सक्रियतेचा परिणाम आहे. अमेरिका, युरोप आणि अन्य देश आता नर्सेससाठी प्रशिक्षणाची सुरूवात करत आहेत, तर आमच्या येथे दोन वर्षांपूर्वीच याची तयारी करण्यात आली होती.

1. जपानजवळ अशाप्रकारच्या आजाराशी लढण्यासाठी अमेरिकाच्या सीडीसीसारखे कोणतेही रोग नियंत्रण केंद्र नाही.
2. अन्य देश रूग्णांच्या शोधासाठी जेथे हायटेक अ‍ॅपचा वापर करत आहेत, तेथे जपानने असे कोणतेही अ‍ॅप बनवलेले नाही.
3. जागतिक आरोग्य संघटना म्हणते की, जास्तीत जास्त टेस्ट झाल्या पहिजेत, पण जपानने एकुण लोकसंख्येच्या केवळ 0.2% लोकांच्याच टेस्ट केल्या.
4. जगाच्या सात सर्वात विकसित देशात सहभागी जपानमध्ये संसर्गाचा वेग सर्वात खाली राहीला आहे आणि मृत्यू सुद्धा 1000 पेक्षा खुप कमी आहेत.

जपानमध्ये हे कसे झाले शक्य ?
1 जीवनशैली
मास्क वापरणे जपानी लोकांच्या जीवनशैलीचा एक प्रमुख भाग आहे, ही परंपरा खुप उपयोगी पडली आहे. तेथे लठ्ठपणाने ग्रस्त लोकांची संख्यासुद्धा कमी आहे. त्यांची बोलण्याची पद्धत अशी आहे, ज्यामध्ये तोंडातून पाण्याचे थेंब पसरणे कमी होते. एवढेच नव्हे, संसर्गाची प्रकरणे समोर येताच सर्वात आधी येथे शाळ बंद करण्यात आल्या.

2 कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
जपानमध्ये 50 हजारपेक्षा जास्त प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आहेत, ज्यांना 2018 मध्ये इन्फ्लूएन्जा आणि क्षयरोगासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. जानेवारीमध्ये पहिले प्रकरण समोर येताच त्यांना सक्रिय करण्यात आले, त्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये महत्वाची भूमिका निभावली. तसेच त्यांनी संशयित समुह, क्लब किंवा हॉस्पिटल्सवर बारकाईने विशेष लक्ष ठेवले.

3 कठोर निर्णय
फेब्रुवारीमध्ये जेव्हा डायमंड क्रूज शिपवर संसर्गाची प्रकरणे समोर आली तेव्हा जपानला अंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेला सामोरे जावे लागले. यानंतर सर्व व्यवस्था बदलली. एप्रिलमध्ये रूग्ण पुन्हा वाढले, तेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली, आता नवीन प्रकरणे एका दिवसात 50 पेक्षा खाली आली आहेत, आणि आणीबाणी हटविण्याची तयारी सुरू आहे.

4 सरकारची सक्रियता
क्रूज शिपवर संसर्ग पसरण्याच्या घटनेकडे जपानने दरवाजावर जळत असलेल्या कारप्रमाणे पाहिले आणि ताबडतोब उपाय सुरू केले. प्रमुख शास्त्रज्ञ, आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर हे लोकांची तपासणी करण्यात गुंतले. टीकेनंतर सुद्धा सरकार आपल्या निर्णयावर ठाम होते.

5 जन जागरुकता
सरकारचे सल्लागार आणि महामारी प्रकरणातील तज्ज्ञ शिगू ओमी म्हणतात की, जपानी लोकांची आरोग्याबाबत जागरूकता सर्वात महत्वाची बाब ठरली. काही तज्ज्ञ सांगतात की, व्हायरसचा जो स्ट्रेन जगातील अन्य देशात आहे, त्यापेक्षा कमजोर स्ट्रेन जपानमध्ये पोहचलेल्या व्हायरसमध्ये आढळून आला, हे सुद्धा एक मोठे कारण आहे.