9 लाखाच्या चांदीने सजवलेला पलंग पॅलेसमधून गायब, नवाबाच्या मुलाने लावला चोरीचा आरोप

रामपूर : वृत्तसंस्था – रामपूर रियासतचे शेवटचे शासक नवाब रझा अली खान यांच्या मालमत्तेत चांदीचे ६ पलंगही समाविष्ट होते, ज्यांची किंमत ९ लाख रुपये सांगितली जात आहे. शेवटच्या शासकाचा मुलगा माजी मंत्री नवाब काझिम अली खान उर्फ नवेद मियांचा आरोप आहे की, हे सर्व पलंग खासबागमधून गायब आहेत.

नवाबांनी रामपूर राज्यावर १७४ वर्षे राज्य केले आहे. शेवटचा नवाब रझा अली खान होते. राज्य भारतीय प्रजासत्ताकमध्ये विलीनीकरणाच्या काही वर्षांनंतर कुटुंबात त्यांच्या संपत्तीच्या विभागणीवरून वाद सुरू झाला होता. हा वाद जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता विभाजन प्रक्रिया जिल्हा न्यायालयात सुरू आहे. यासाठी मालमत्तेचे सर्वेक्षण करून मूल्यांकन करण्यात आले आहे.

या यादीत चांदीचे ६ पलंगही नवाब रझा अली खान यांच्या मालमत्तेचा भाग असल्याचे म्हटले गेले आहे. यात चांदीच्या पलंगांची किंमत दीड लाख इतकी आहे. यानुसार, सर्व पलंगाची किंमत नऊ लाख आहे. शेवटचा शासक नवाब रझा अली खान यांचे पुत्र माजी मंत्री नवाब काझीम अली खां उर्फ नवेद मियां यांनी आरोप केला आहे की, कोर्टाने नियुक्त केलेले वकील आयुक्त जेव्हा सर्वेक्षणासाठी खासबाग पॅलेसला गेले होते, तेव्हा तेथे कोणताही चांदीचा पलंग नव्हता. हे चांदीचे पलंग पॅलेसच्या रॉयल स्वीटमध्ये असायचे, जे गायब केले गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, चांदीच्या पलंगाची किंमत व्यापार्‍यांच्या शेअर्समधून वजा केली जाईल.

साडेपाच लाखांचा हुक्का
नवाब रामपूरच्या संपत्तीचे सर्वेक्षण त्यांचे राजेशाही राहणीमान दर्शवते. जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टात जंगम मालमत्तेच्या सर्वेक्षण अहवालात असा दावा केला गेला आहे की, नवाब रामपूर जो हुक्का घ्यायचे, त्याची किंमत सध्या साडेपाच लाख रुपये आहे. इतकेच नाही तर त्याच्या पानदानाची किंमतही सुमारे पावणे दोन लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.