नोएडा : मसाज करण्यासाठी गेलेल्या DRDO च्या शास्त्रज्ञाचे अपहरण, रात्री उशीरा पोलिसांनी केले मुक्त, तिघांना अटक

नवी दिल्ली : वृत्त संस्था – राजधानी दिल्ली (Delhi ) लगतच्या नोएडामध्ये मसाजच्या अमिषाला बळी पडलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) ज्यूनियर शास्त्रज्ञाचे खंडणीखोरांनी अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून खंडणी मागीतली. शास्त्रज्ञाच्या अपहरणाची माहिती मिळताच, पोलीस कमिश्नरच्या नेतृत्वाखाली सहा पथकांनी तपास सुरू केला आणि रविवारी रात्री उशीरा शास्त्रज्ञाची गुन्हेगारांच्या तावडीतून सुटक केली. पोलीसांनी याप्रकरणी एका महिलेसह तीन लोकांना अटक केली आहे. आरोपीच्या साथीदारांची नावे समोर आल्यानंतर पोलिसांची पथके त्यांच्या अटकेसाठी विविध ठिकाणी तपास करत आहेत.

डीआरडीओच्या दिल्ली येथील ऑफिसमध्ये जूनियर शास्त्रज्ञ पदावर कार्यरत ही व्यक्ती नोएडा सेक्टर-77 येथील सोसायटीमध्ये राहाते. अपर आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था लव कुमार यांनी सांगितले की, या शास्त्रज्ञाने सोशल साइटच्या माध्यमातून मसाज सेंटरचा नंबर मिळवला आणि त्यावर संपर्क साधला होता.

शनिवारी मसाज सेंटरचा एक माणूस आला आणि ते दोघे नोएडातील एका हॉटेलमध्ये मसाजसाठी पोहचले, जेथे थोड्याच वेळात तीन-चार अन्य व्यक्तीसुद्धा आल्या आणि त्यांनी शास्त्रज्ञाला धमकावत सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आणि ते आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगू लागले.

त्यांनी शास्त्रज्ञाला त्याच हॉटेलच्या एका खोलीत कोंडून ठेवले आणि त्यांच्या कुटुंबियांकडे दहा लाख रूपयांची मागणी करत धमकी दिली. पैसे न मिळाल्यास त्यास अटक होईल आणि नोकरी जाण्याची भिती दाखवली. याची माहिती रविवारी पोलीसांना मिळाली आणि पोलिसांनी सहा पथके तयार करून तपास सुरू केला.

रात्री उशीरा नोएडाच्याच एका हॉटेलवर छापा टाकून शास्त्रज्ञाला मुक्त करण्यात आले. यावेळी एका महिलेसह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींची चौकशी सुरू आहे.

डीआरडीओ मुख्यालयातून पोलिसांना मिळाली माहिती
पोलीस सूत्रांनुसार, शास्त्रज्ञाचे अपहरण झाल्याची माहिती डीआरडीओ मुख्यालयाकडून नोएडा पोलिसांना मिळाली होती. ज्यानंतर पोलीस कमिश्नर आलोक सिहं यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला. याप्रकरणातून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.