पुणे विद्यापीठ : परीक्षा विभागात सुरक्षारक्षकांकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परीक्षा विभागात तक्रार घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याला परीक्षा संचालकाच्या कक्षात व्हिडिओ शूटींग केल्याच्या कारणावरून विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला असून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आदित्य तांगडे – पाटील असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आदित्य गरवारे महाविद्यालयात बीएसस्सीच्या अंतिम वर्षात शिकतो. त्याने ऑनलाईन परीक्षा दिली होती. त्यात त्याला सर्व विषयात चांगले गुण असून एका विषयात शून्य गुण मिळाे होते. त्यामुळे त्याने परीक्षा विभागात 18 नोव्हेंबरला तक्रार दाखल केली होती. त्याला वारंगल येथील नॅशनल इन्स्टियुट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एनआयटी) एमएस्सीला प्रवेश मिळाला आहे.

त्याला 1 डिसेंबरपर्यंत गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे. पण तो बीएस्सीला नापास झाल्याचे दाखवल्याने एक वर्ष वाया जाणार आहे. त्यामुळे लवकर गुणपत्रिका मिळावी, यासाठी गेल्या काही दिवसांपासून तो विद्यापीठात हेलपाटे मारत होता. बुधवारी दुपारी परीक्षा विभागातील काही अधिका-यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांना भेटण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरु केल्याने डॉ. काकडे यांनी त्यास जाब विचारत बाहेर जाण्यास सांगितले.

त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला मारहाण करत तळमजल्यावर आणले. तसेच त्याला जमीनीवर बसवून कोंबडा करायला लावले. संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यत दोन तास हा प्रकार सुरु होता. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला मोटारीत टाकून विद्यापीठाच्या बाहेर सोडले. त्यानंतर गुुरुवारी सकाळी आदित्य आणि त्याच्या पालकाने प्र कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी व कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकारची कैफियत मांडली. त्यावेळी तूझे नुकसान होणार नाही, असे आश्वासन आदित्यला दिले.

याबाबत परीक्षा विभागाचे संचालक महेश काकडे म्हणाले की, परीक्षा विभागातील कामकाज हे गोपनीय असते. येथे व्हिडिओ शूटींग करणे योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्याला केबिनमधून बाहेर घेऊन जाण्यास सुरक्षा रक्षकास सांगितले होते. त्याला खाली मारहाण झालेल्या प्रकाराबाबत मला माहिती नाही, असे ते म्हणाले.

You might also like