ट्रॅक्टरखाली चिरडल्याने १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन- परिक्षा केंद्रावर ट्रॅक्टरने डेस्क व बेंच सोडण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा ट्रॅकरवरुन खाली पडून चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास किटाडी येथे घडेली. चेतन विनायक जवंजाळ (रा. मिरेगाव) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावामध्ये तणाव निर्णाण झाला असून मुख्याध्यापक, शाळेचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गावकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.

चेतन हा मिरेगाव येथील शुक्राचार्य विद्यालयाचा इयत्ता नवव्या वर्गाचा विद्यार्थी होता. बारावी व दहावीचे परीक्षा केंद्र मुंडीपार येथे असल्याने शाळेच्या शिक्षकांनी ट्रॅक्टरद्वारे डेक्स बेंच पाठविण्यात आले होत. हे साहित्य पोहचवून देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. मुंडीपार येथील शाळेत साहित्य उतरवून ट्रॅक्टरमधून परत येत असताना किटाडी येथे अचानक चेतन हा ट्रॅक्टर चालकाजवळील जागेहून खाली कोसळला. यात ट्रॅक्टरच्या चाकात सापडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी गर्धी केली. जोपर्यंत मिरेगाव येथील मुख्याध्यापक व संचालक घटनास्थळी येऊन जाहीर माफी मागत नाही व त्यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. घटनास्थळी आमदार बाळा काशीवार, तहसीलदार तथा लाखनी, साकोलीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत.