नेत्यांची फोनवरील चर्चा समजणारं तंत्रज्ञान अजून तरी नाही : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंना फोन करुन जागावाटपाची चर्चा केली याबाबतची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली. मात्र ही बाब भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना खटकलेली दिसत आहे. फोनवर दोन मोठ्या नेत्यांमध्ये एखादी चर्चा झाली आणि ती पत्रकारांना समजली, असं काही तंत्रज्ञान अजून तरी विकसित झालेलं नाही’ अशी प्रतिक्रिया देत मुनगंटीवार यांनी पत्रकारांना सुनावले आहे.

मुनगंटीवारांनी १७१-११७ असं जागावाटपाचं सूत्र शिवसेनेने दिल्याची चर्चा फेटाळून लावली. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे’ हे परिपक्व नेते आहेत. १९९५ च्या फॉर्म्युल्याची मागणी ते आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये करतील, असं मला वाटत नाही. या बातम्या कपोलकल्पित असून कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून आल्या आहेत. जास्तीत जास्त जागा कोणी लढवायच्या यासाठी युती नसते, तर जास्तीत जास्त जागा निवडून आणून जनहिताचे सरकार आणण्यासाठी होते. युती व्हावी ही तर आमची जाहीर मागणी आहे, आम्ही ती अनेकदा बोलून दाखवली आहे. याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. फोनवर तर आमचं रोजच बोलणं होतं.

ठाकरे-शाह यांच्यात फोनवरुन चर्चा
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंना फोन करुन जागावाटपाची चर्चा केली. लोकसभा निवडणुकीपुरताच अमित शाहांचा जागावाटपाचा आग्रह आहे. मात्र विधानसभेसाठीही जागावाटप व्हावं, अशी उद्धव यांची भूमिका आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी १९९५ च्या जागावाटपाचं सूत्र मंडळ आहे. १९९५ मध्ये शिवसेनेने विधानसभेच्या १७१ आणि भाजपने ११७ जागा लढवल्या होत्या. त्यावेळी १३८ जागा जिंकून राज्यात शिवसेना-भाजप युतीचं पहिलं सरकार स्थापन झालं होतं. परिणामी, जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार राज्यात युतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचाच दावा असेल.

लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसं महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या युतीचं काय होणार ? याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. मात्र या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वांनी युतीबाबतच्या चर्चा अत्यंत गोपनीय ठेवल्या आहेत.