भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे मोठ विधान, म्हणाले – ‘ठाकरे सरकार पडेल अन् 4 महिन्यानंतर भाजप सत्तेत येईल’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत होते. मात्र महाविकास आघाडी सरकार हे बेईमानीने सत्तेत आले आहे. जनहित विरोधी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. अन्यायकारक सरकार टिकवणे हे सुद्धा आमच्या हातून सर्वांत मोठी घोडचूक होईल. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे. भाजपचे मिशन महाराष्ट्र सुरू झाले आहे. शुभकार्य कधी ना कधी होणार असून हे सरकार तीन ते चार महिन्यात पडेल. त्यानंतर भाजप सत्तेत येईल, असा विश्वास भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

सुधीर मुनगंटीवार गुरुवारी (दि. 11) नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी (दि. 10) संपले. सभागृहात विविध प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच वाद झाले. सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलाच समाचार घेतला. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. मनसुख हिरेण यांच्या खूनप्रकरणावरून भाजपने सरकारला चांगलेच घेरण्याचा प्रय़त्न केला. या सर्वावर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील भाष्य केले. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी संघ मुख्यालय गाठत सरसंघचालकांची भेट घेतली. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र 20 ते 25 मिनिट झालेल्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले.