NRC ला शिया वक्फ बोर्डाचा पाठींबा, डावे करणार जोरदार देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये सीएए विरोधात जोरदार आंदोलने होत असताना आता एनआरसीच्या अंमलबजावणीला उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डने गुरुवारी पाठींबा दिला आहे. तसेच भारतीय मुसलमानांना यामुळे काहीही धोका नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. देशाला खरा धोका आहे तो घुसखोरांचा, एनआरसीमुळे हिंदुस्थानी मुसलमानांना काहीही धोका नसल्याचे बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले नेमकं वसीम रिझवी
एनआरसी आणि नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या (सीएए) नियोजित अंमलबजावणीविरोधात देशभर निषेध होत असताना रिझवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.घुसखोर हे समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेससाठी मतपेट्या आहेत. काँग्रेस बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून घुसलेल्यांचे मतदार ओळखपत्रे बनवत आहे.

जर एनआरसीची अंमलबजावणी झाली तर त्यांचा खरा चेहरा उघडा पडेल असे स्पष्ट मत रिझवी यांनी मांडले आहे. रिझवी ठामपणे म्हणाले की, इतर देशांतून हिंदू भारतात येतात ते तेथे होत असलेल्या अत्याचारांमुळे, तर मुस्लिम येतात ते त्यांच्या वैयक्तिक लाभासाठी किंवा मग भारताला दुखापत करण्यासाठी.’ फक्त भारतीय मुस्लिम हे हिंदुस्थानी असून उर्वरित हे घुसखोर असून त्यांनी देश सोडून जायला पाहिजे, असे मत रिझवी यांनी व्यक्त केले.

आसाममध्ये २४ मार्च, १९७१ रोजी किंवा त्या आधीपासून राहत असलेल्या अस्सल भारतीय नागरिकांना तसेच बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांना शोधण्यासाठी एनआरसी राबवले गेले. ३.३ कोटी अर्जांपैकी १९ लाख लोकांना गेल्या ३० आॅगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या आसामच्या अंतिम एनआरसीतून वगळण्यात आले आहे.

डावे पक्ष करणार देशव्यापी निषेध
येत्या १ जानेवारी ते ७ जानेवारीपासून सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात संपूर्ण देशभरात डाव्या विचार सरणीच्या सर्व पक्षांकडून आंदोलन केले जाणार आहे आणि या कायद्याविरोधात निषेध व्यक्त केला जाणार आहे.तसेच ८ जानेवारी रोजी सर्वत्र सार्वजनिक संपही केला जाणार आहे. याबाबतची घोषणा गुरुवारी माकप, भाकप, भाकप (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट)-लिबरेशन, आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टीने एक संयुक्त निवेदन देऊन केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/