निवडणुकीत होतोय काळ्या पैशाचा वापर, अटर्नी जनरलची सर्वोच्च न्यायालयात कबुली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणुकीतील अटी आणि शर्थीचे भंग केल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांना प्रश्न विचारले आहेत. निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर होत आहे, अशा आशयाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान अटर्नी जनरल म्हणाले, निवडणुकीत काळा पैसा वापरला जातो यात तथ्य आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने वापरला जातो. यात काहीही नवीन नाही.

आगोदरपासूनच हे होत आले आहे. राजकीय पक्षांचे नेते हेलिकॉप्टरने दौरे करतात, ज्यावर भरमसाट पैसा खर्च होतो. एवढा पैसा कुठून येतो. तो काळा पैसाच असतो, अशी कबुली खुद्द अटर्नी जनरल यांनी दिली आहे. केंद्र सरकारने काळा पैसा संपवण्यासाठी इलेक्टोरल बाँड संकल्पना आणली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या पीठाने इलेक्टोरोल बाँडसंदर्भातील याचिकेवर सुनावणी केली. न्यायालयाने निवडणूक संपेपर्यंत इलेक्टोरोल बाँडवर बंदी आणली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आयकर विभाग सज्ज झाला आहे. यासाठी खास पथके तैनात करण्यात आली आहेत. अबकारी खाते, पोलीस खाते यांच्या सहकार्याने आयकर खातेही आता सज्ज झाले आहे. या काळात बँकांमध्ये होणाऱ्या मोठ्या रकमांच्या व्यवहारांची माहिती बँकांनी निवडणूक आयोगाला देण्याची सक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून तसेच मौल्यवान वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावरील खरेदीवरही आयकर खात्याची नजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.