दारूची दुकानं बंद करण्यासाठी पोहोचले ‘सर्वोच्च न्यायालयात’, कोर्टानं ‘याचिका’ फेटाळत ठोठावला 1 लाखांचा ‘दंड’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने कोरोना विषाणूमुळे देशभरात लागू लॉकडाऊनच्या दरम्यान खुली करण्यात आलेली दारूची दुकाने बंद करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. कोर्टाने दोन याचिकांवर सुनावणी केली आणि दोघांनाही 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. कोर्टाने दोन्ही याचिका फेटाळल्या आणि म्हटले की हे सर्व केवळ प्रसिद्धीसाठी केले जात आहे.

लॉकडाऊन 3.0 दरम्यान गृहमंत्रालयाने 4 मे पासून दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. यासंदर्भात गृह मंत्रालयाने म्हटले होते की कंटेनमेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत. याशिवाय रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीनही झोनमध्ये दारूची दुकाने उघडली जातील.

यासोबतच अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या की सोशल डिस्‍टेंसिंगचे नियम पाळले आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे आणि पान, गुटखा, तंबाखू इत्यादी खाण्यास परवानगी दिली जाणार नाही असे देखील सांगण्यात आले होते. तसेच, मद्य दुकानदारांनी याची खात्री करुन घ्यावी की ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर असावे. तसेच दुकानात एकावेळी पाचपेक्षा जास्त लोक नसावेत.