सुरेश रैना IPL 2020 मध्ये पुन्हा खेळण्यास तयार, केले अनेक खुलासे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुरेश रैनाने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल २०२० सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात रैना युएईहून भारतात परतला. सुरेश रैनाने हेही स्पष्ट केले की, त्याच्यात आणि सीएसकेमध्ये कोणताही वाद झालेला नाही. रैनाने सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांच्याबाबत म्हटले आहे की, एक वडील आपल्या मुलाला ओरडू शकतात. सुरेश रैनाने एका क्रिकेट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले आहे की, तो आपली पत्नी व मुलांची चिंता असल्याने भारतात परतला आहे. आयपीएल २०२० मध्ये तो अजूनही चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू शकतो, असा खुलासा रैनाने केला आहे.

सुरेश रैनाने आपल्या भारतात परतण्याच्या निर्णयाबद्दल म्हटले की, “हा माझा वैयक्तिक निर्णय होता आणि मी माझ्या कुटुंबामुळे परत आलो आहे. अशी काही गोष्ट होती की, मला माझ्या कुटुंबासमवेत राहायचे होते. सीएसकेही माझे कुटुंब आहे आणि माही भाई (एमएस धोनी) माझ्यासाठी सर्वकाही आहे. अशा परिस्थितीत हा एक कठीण निर्णय होता, जो मला घ्यावा लागला. माझ्यात आणि सीएसके मध्ये कोणताही वाद नाही. कोणीही कोणतेही ठाम कारण न नसताना साडे १२ कोटी रुपये सोडू शकत नाही. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो असलो, तरी मी अजून तरूण आहे आणि ४-५ वर्षे आयपीएल खेळू शकतो.”

तसेच सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांनी रैनाबद्दल बरेच काही म्हटले होते. त्याबद्दल रैनाने आता म्हटले आहे की, “ते (श्रीनिवासन) माझ्या वडिलांसारखे आहेत आणि ते नेहमीच माझ्या पाठीशी उभे असतात. ते माझ्यासाठी अगदी जवळचे आहेत. ते माझ्याशी छोट्या मुलासारखे वागतात आणि एक वडील आपल्या मुलाला ओरडू शकतात. मी आयपीएल का सोडली, हे त्यांना माहित नाही. आता त्यांना कळले आहे आणि आमचे बोलणेही झाले आहे.” सीएसकेमध्ये परत आल्यावर सुरेश रैनाने म्हटले आहे की,” मी इथे क्वारंटाइनमध्ये राहत असतानाही ट्रेनिंग करत आहे. तुम्हा सर्वांना माहित नाही की, तुम्ही मला पुन्हा एकदा तेथील शिबिरामध्ये पाहू शकता.” रैनाने म्हटले आहे की, सीएसकेचे दरवाजे अद्यापही माझ्यासाठी बंद झालेले नाहीत. धोनी माझ्या मोठ्या भावासारखा आहे. युएईमध्ये कोरोना विषाणूची परिस्थिती सुधारली, तर तो आयपीएलमध्ये परतू शकतो.

सुरेश रैनाने कुटुंबीयांबाबत म्हटले आहे की, “माझं एक तरुण कुटुंब आहे आणि मला काळजी होती की मला काही झाले तर त्यांचे काय होईल? माझे कुटुंब माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे आणि या वेळी मला खरोखर त्यांची खूप काळजी वाटत आहे. परत आल्यानंतरही २० दिवसांहून अधिक काळ मी माझ्या मुलांना पाहिलेले नाही, कारण मी क्वारंटाइनमध्ये आहे.” मात्र सुरेश रैनाने असेही म्हटले आहे की, बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंट सर्वांची काळजी घेत आहेत, परंतु तरीही त्याला घराबद्दल काळजी वाटत होती, कारण अलीकडेच त्याच्या काकाच्या घरावर अज्ञात लोकांनी हल्ला केला होता, ज्यात काका आणि त्यांचा मुलगा मारला गेला.