अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय ! SC च्या निर्णयानंतर बिहारच्या डीजीपींचा ‘आनंद’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपवण्याचा आदेश देत महाराष्ट्र पोलिसांना मोठा धक्का दिला आहे. निर्णयानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रचंड आनंदी असून हा 130 कोटी जनतेच्या भावनांचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.

गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले की, न्यायालयाच्या निर्णयामुळे 130 कोटी जनतेच्या मनात सर्वोच्च न्यायालयायबद्दल असलेली आस्था अजून दृढ झाली आहे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वाढला आहे. आता लोकांना सुशांत सिंह प्रकरणी न्याय मिळेल असा विश्वास वाटू लागला आहे. ही संपूर्ण देशासाठी मोठी बातमी आहे. आमच्यावर अनेक आरोप केले जात होते. केस दाखल का केली अशी विचारणा होत होती. तपासासाठी अधिकार्‍याला पाठवले तर त्याला कैद्याप्रमाणे क्वारंटाइन करण्यात आले.

यावरुनच लोकांना काहीतरी गडबड असल्याचं वाटत होते. आम्ही जे काही काम केलं ते कायदेशीर पद्धतीने केले. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे, असे ते म्हणाले. मुंबई पोलिसांनी केलेला तपास अगदी चुकीचा आणि बेकायदेशीर होता. आम्ही करत असलेल्या तपासातून निकाल हाती येणारच. कारण ही फक्त एका व्यक्तीची, एका कुटुंबाची किंवा माझी वैयक्तिक लढाईनाही तर 130 कोटी जनता ज्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांची लढाई आहे, असे पांडे यांनी म्हटले आहे.