‘चायना मेड’ टेस्ट कीटनं साधा सर्दी-ताप असणार्‍या 3700 जणांना दाखवलं ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, स्वीडनमध्ये खळबळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने चीनमधून आयात करण्यात आलेले टेस्ट कीट सदोष असल्याचे म्हटले आहे. या कीटच्या मदतीने चाचण्या करण्यात आलेल्या 3700 जणांवर कोरोनाचे उपचार सुरु करण्यात आले. मात्र हे लोक ठणठणीत असल्याचे उघड झाले आहे . कोरोना चाचणी कीटमध्ये असणार्‍या दोषांमुळे रुग्णांच्या चाचणीचे निकाल सकारात्मक दाखवण्यात आले होते.

चीनमधून आयात करण्यात आलेले पीसीआर कोरोना चाचणी कीट सदोष असल्याने सर्व चाचण्यांचे निकाल पॉझिटिव्ह दाखवण्यात आले. चीनमधील बीआयजी जेनोमिक्स कंपनीच्या या टेस्ट कीटमुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. याच कंपनीचे कीट जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या कीटच्या मदतीने चाचणी करण्यात आलेल्या लोकांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षण दिसून येत नव्हती. मात्र चाचणीचे निकाल सकारात्मक आल्याने हे असिम्पटोमॅटिक रुग्ण असल्याचे गृहित धरुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. याच कीटच्या आधारे स्वीडनमध्ये मार्च महिन्यापासून चाचण्या घेण्यात येत आहेत. चाचण्यांच्या आधारावर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ठरवला जात आहे. त्यामुळेच आता स्वीडनमधील आरोग्य खात्याने सर्वच प्रकरणांची चौकशी करण्याचा विचार करत असून पुढील नियोजन करत आहे.