महाराष्ट्राला निवडणुकीतच स्वाईन फ्लूचा विळखा; जाहीर सभांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गतवर्षीच्या १ जानेवारी २०१८ पासून मार्च अखेर पर्यंत आढळून येणाऱ्या स्वाईन फ्लूच्या रुग्णाच्या तुलनेत २०१९ मध्ये अडीच पटीने वाढ झाली आहे. तर स्वाईन फ्लूने होणारे मृत्यू हि बारा पटीने वाढले आहेत. स्वाईन फ्लू हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूग्रस्त रुग्णाच्या संपर्कात येण्याने हा आजार वाढतो. म्हणून लोकसभा निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभामुळे हा आजार वाढण्याचा धोका वैद्यकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

१ जानेवारी २०१८ ते मार्च अखेर म्हणजे तीन महिन्यात महाराष्ट्रात ८१२ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले होते. त्यापैकी पाच जण उपचारात दगावले होते. तर १ जानेवारी २०१९ ते आज तागायत हि संख्या अडीच पटीने वाढली आहे. सध्या महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे २ हजार २७६ एवढे रुग्ण आहेत. या तीन महिन्याच्या काळात ६४ स्वाईन फ्लू रुग्णांचे मृत्यू झाले असून त्यापैकी २२ मृत्यू हे नागपूर विभागातील आहेत. तसेच २२ पैकी १३ मृत्यू हे एकट्या नागपूर शहरात झाले आहेत. नागपूर शहरात स्वाईन फ्लूने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. शहरात सर्वाधिक मृत्यू होत असताना देखील महानगर पालिकेचा आरोग्य विभाग यावर कसलीही कार्यवाही करत नाही. स्वाईन फ्लूच्या बाबतीत नागपूर विभागाच्या खालोखाल पुणे विभागाचा नंबर लागतो. २०१९ मध्ये पुणे विभागात ७६० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १६ जणांचे मृत्यू झाले आहेत.

“राज्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णाची संख्या वाढत चालली आहे. मार्च महिन्यानंतर हि संख्या वाढण्याचा अधिक संभव आहे. या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा आरोग्य केंद्रापर्यंत सर्व रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रतिबंधात्मक लसीची उपलब्धी देखील प्रत्येक रुग्णालयात करून देण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, घराबाहेर पडताना तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधणे, दैनंदिन जीवनात व्यक्तिगत स्वच्छतेची निगा राखणे यामुळे स्वाईन फ्लू या प्राणघातक आजरापासून दूर राहता येते.”
– डॉ. प्रकाश भोई, सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, पुणे