व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या तडीपार गुंडाला बेड्या ; दोघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गुन्हेगारांचा उपद्रव शहरात कमी व्हावा यासाठी त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. परंतु या तडीपार गुंडांकडून तडीपारीच्या काळातही शहरातील उपद्रव काही थांबता थांबेना.  तावरे कॉलनी परिसरात एका तडीपार गुंडाने व्यावसायिकाला स्टॉल टाकण्यासाठी जागा मागत दरमहा १० हजार रुपयांचा हप्ता मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुंडासह त्याच्या भावाला अटक केली आहे.

शाहरुख वसीम खान (२३), मुबारक वसीम खान (१९) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी राजेंद्र लक्ष्मण लगस (५२, अरण्येश्वर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र लगस हे अग्निशमन दलामध्ये नोकरीस आहेत. तावरे कॉलनी परिसरात त्यांचे गाळे आहेत. तेथे त्यांचा भाऊ आणि मुलगा व्यवसाय करतात. दरम्यान शाहरुख खान हा सराईत गुंड असून त्याला शहर व परिसरातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीच्या कालावधीतही शहरात येऊन राहिल्याबद्दल त्याच्यावर एका आठवड्यापुर्वीच कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान सोमवारी सायंकाळी राजेंद्र लगस यांचे भाऊ गणेश लगस हे त्यांच्या कार्यालयात मित्रासोबत बसलेले असताना शाहरुख खान तेथे आला. त्याने तेथे स्टॉल टाकण्यासाठी जागा व दरमहा १० हजार रुपये हप्त्याची मागणी केली. त्यानंतर त्यांना धमकावत पार्क केलेल्या दुचाकीला लाथा मारून तिचे नुकसान करून तेथून पळून गेला.

यापूर्वीही केली होती कारवाई

शाहरुख खान हा परिसरातील सराईत गुंड असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.  त्याला परिमंडल २ चे पोलीस उपायुक्त यांनी तडीपार करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानंतरही तो तडीपारीच्या कालावधीत फेब्रुवारीमध्ये शहरात आल्यामुळे अटक करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर त्याच्यावर कारवाई करूनही तो पुन्हा शहरात आला आणि खंडणीची मागणी केली.

शहरातून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुंडांना तडीपार करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे.  परंतु तडीपारीच्या काळातही गुन्हेगार शहरात येऊन अशी कृत्ये करत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.