TV चॅनल बदलण्यास सांगितल्याच्या रागातून 7 वर्षाच्या मुलीचा खून

थुट्टुकुडी/तामिळनाडू : वृत्तसंस्था – शेजाऱ्यांकडे टीव्ही बघण्यासाठी गेलेल्या मुलीचा खून केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी तामिळनाडूतील थुट्टुकुडी जिल्ह्यातील सथंकुलम शहरात घडला आहे. 7 वर्षाची मुलगी शेजाऱ्यांकडे टीव्ही बघण्यासाठी गेली होती. त्यावेळी तीने चॅनल बदलण्यास सांगितले. याचा राग आल्याने तिचा गळा आवळून खून केला.

घरामध्ये लाईट नसल्याने मृत मुलगी शेजाऱ्यांकडे टीव्ही बघण्यासाठी जात होती. घटनेच्या दिवशी मृत मुलीच्या शेजाऱ्यांच आपल्या वडिलांशी भंडण सुरु होतं. त्यातच मुलीने चॅनल बदलण्यासाठी शेजाऱ्यांकडे रिमोटची मागणी केली. यावेळी संतापलेल्या शेजाऱ्याने या मुलीचा गळा आवळून तिचा खून केला. भानावर आल्यानंतर शेजाऱ्याने या मुलीला घरातील प्लास्टिकच्या पिंपात ठेवून त्यावर कचरा टाकला. मित्राच्या मदतीने आरोपीने हा पिंप घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कालव्याच्या ठिकाणी नेऊन पुरला.
स्थानिक गावकरी आणि मृत मुलीच्या नातेवाईकांनी गुन्हा घडण्याच्या वेळी आरोपी नशेत होता आणि त्यानेच मुलीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार केली. मात्र, पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

पीडित मुलीची आई ही रोजंदारीवर काम करते. कालव्याजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीला प्लास्टिकचं पिंप संशयास्पद रितीने पुरलेलं दिसले. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून अवघ्या दोन तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी विरुद्ध पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.