दुचाकींची समोरासमोर धडक, शिक्षकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

नांदेडः पोलीसनामा ऑनलाइन – दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुस-या दुचाकीवरील पुरुष व महिला दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मांजरम (ता. नायगाव) शिवारात गुरुवारी (दि. 29) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

शेषेराव भुजंगराव पवार (वय 54) असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते मांजरम येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. शिक्षक व साहित्यिक असलेल्या पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी नांदेडच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवार हे शाळेच्या कामानिमित्त गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास दुचाकीवरून नांदेड येथून मांजरमला येत होते. तर मुखेड तालुक्यातील मंडलापुर येथील जावाई व सासू हे दोघेही कामानिमित्त नांदेडला जात असताना समोरासमोर जबर धडक झाली. यात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील गंभीर दोन्ही जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलावून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले. दरम्यान मृत पवार यांच्यावर नांदेड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.