7 वर्ष शिकवत होती ट्यूशन, त्यालाच घेऊन पळून गेली शिक्षिका

गोरखपूर : वृत्तसंस्था – ज्या विद्यार्थ्याला सात वर्षे शिकवले त्याच मुलासोबत शिक्षिकेने धूम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरात उघडकीस आला आहे. रामगड ताल परिसरातील एका प्रसिद्ध शाळेत 12 वीत शिकणाऱ्या मुलासोबत शिक्षिका पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शाळा व्यवस्थापन व मुलाचे कुटुंब गोंधळून गेले आहेत. मुलाच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. तर मुलाला घेऊन पळून गेलेल्या शिक्षिकेची मोठी बहिण एका शाळेत प्राचार्य असल्याची माहिती समोर आली आहे.

मुलाच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून बेपत्ता झालेल्या मुलाचा आणि शिक्षिकेचा शोध सुरु करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामगड ताल परिसरतील आझादनगर रुस्तमपूर येथील व्यावसायिकाचा मुलगा याच परिसरातील एका सरकारी शाळेत शिकत आहे. तो बारावीच्या वर्षात शिकत आहे. तर शिक्षिकेचे घर विद्यार्थ्याच्या घराजवळ असून ती त्याची शिकवणी घेत होती.

बेपत्ता मुलगा हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे. यापूर्वी त्याला शिक्षिकेची मोठी बहिण शिकवत होती. नंतर ती प्राचार्य झाल्यानंतर मुलाची शिकवणी लहान बहिण घेत होती. मुलाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार 1 मार्च रोजी मुलगा टी-शर्ट खरेदी करण्याच्या बहाण्याने सकाळी अकराच्या सुमारास घरातून बाहेर पडला. मात्र, संध्याकाळपर्यंत तो घरी परतला नाही.

मुलाच्या मोबाइलवर फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फोन बंद लागत होता. दरम्यान मुलगा शिक्षिकेसोबत गेल्याची माहिती कुटुंबाला मिळाली. मुलाच्या घरच्यांनी शिक्षिकेच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावळी शिक्षिका देखील बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबाला मिळाली. मुलाच्या कुटुंबीयाकंडून आणि पोलिसांकडून बेपत्ता मुलाचा आणि शिक्षिकेचा शोध सुरु आहे.