World Cup 2019 : ‘या’ तारखेला होणार भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक दिवसीय विश्वचषक स्पर्धा ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुढील सोमवारी बैठक झाल्यानंतर १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा १५ एप्रिलला केली जाईल. त्यामुळे या संघात नक्की कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये ३० मे रोजी होणार आहे. तर अंतिम लढत १४ जुलैला होणार आहे. या स्पर्धेत भारताची पहिली लढत दक्षिण आफ्रिकेसोबत ५ जूनला होईल. पहिल्या फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भारत १६ जूनला मैदानात उतरणार आहे.

१९८३ मध्ये भारताला पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची संधी मिळाली. त्यानंतर तब्ब्ल २८ वर्षांनी भारताने वर्ल्ड कप जिंकला. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ तिसरा आहे ज्याने दोन किंवा अधिकवेळा विश्व चषकावर आपले नाव कोरले आहे.