चिनी उपकरणांच्या वापरावर TRAI नं व्यक्त केली चिंता, ‘या’ रणनीतीमुळं घरगुती उत्पादन वाढविण्यावर दिला जोर

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेमुळे काही महिन्यांपूर्वी 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. सरकारचं असं म्हणणं होतं की, चिनी ॲप्स भारतीयांचा डेटा चीनी सरकारबरोबर शेअर करतात. चिनी ॲपवर बंदी आल्यापासून भारतात चिनी उपकरणांचा वापर चिंताजनक झाला आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) देखील दूरसंचार कंपन्यांना या प्रकरणात सतर्क राहण्यास सांगितले आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार, दूरसंचार कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात चिनी उपकरणांच्या वापराविरूद्ध खबरदारी घ्यावी आणि घरगुती उपकरणांच्या वापरावर जोर दिला पाहिजे.

ट्रायने ‘धोरणात्मक’ कारणास्तव घरगुती उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. तसेच, चिनी उपकरणांचा वापर कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ट्रायचे अध्यक्ष आरएस शर्मा म्हणाले की, मोबाइल हँडसेट उत्पादनासाठी भारत एक प्रमुख केंद्र बनला आहे. परंतु टेलिकॉम उपकरणांच्या बाबतीतही हे करणे आवश्यक आहे. हे रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या दूरसंचार नेटवर्कचा एक संवेदनशील आणि मध्य भाग आहे. शर्मा म्हणाले की, नियामकाने पहिलेच स्थानिक पातळीवर दूरसंचार उपकरणांच्या निर्मितीसंदर्भात सविस्तर शिफारसी दिल्या आहेत.

ट्राय प्रमुखांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण जागतिक स्तरावर सुरक्षेच्या कारणामुळे दूरसंचार नेटवर्कमध्ये चिनी उपकरणे न वापरण्याविषयी आवाज उठविला जात आहे. भारत अद्याप मूल्यांकन करीत आहे की, Huawei आणि ZTE सारख्या दिग्गज चिनी कंपन्यांना आगामी 5G चाचणीमधून वगळता येईल का? मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. शर्मा म्हणाले की, हे जर देशाच्या धोरणात्मक हिताचे असेल तर आम्ही देशांतर्गत दूरसंचार उपकरणांच्या निर्मिती प्रक्रियेस गती देऊ.