ठाकरे सरकार कंगनाच्या मागे लागण्यापेक्षा कोरोनाच्या मागे लागले असते तर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षानं राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ‘कंगना राणावतच्या मागे लागण्यापेक्षा राज्य सरकार करोनाच्या मागे लागले असते तर आज महाराष्ट्राची ही दुरावस्था ओढवली नसती,’ असा टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ११ लाखांहून जास्त आहे.

मृत्यूचा संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यभरात जवळजवळ ३ लाखांच्या वर लोक वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर लाखो लोक होम क्वारंटाइन आहेत. रुग्णालयात बेड मिळत नसल्याने काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच संसर्ग वाढण्याला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी वृत्तपत्रांत आलेल्या कोरोना संबंधीच्या बातम्या ट्विट करून राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात परिस्थिती खूप बिकट आहे. घरात बसून सोशल मीडियावर शब्दांची फेकाफेक करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आता घराबाहेर पडावं,’ असा खोचक सल्ला आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.