प्राजक्ता माळीच्या अडचणी वाढल्या, ‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ड्रेस डिझायनरला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ड्रेस डिझायनरला मारहाण करून धमकावल्याप्रकरणी ठाणे दंडाधिकारी न्यायालयाने कलमवाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासोबतच तिला पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचे समन्सही जारी केले आहेत.

प्राजक्ता माळी हिची ड्रेस डिझायनर जान्हवी मनचंदा हिला तिने मारहाण केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शनिवारी त्यावर सुनावणी झाली. त्यात गुन्हा दाखल होण्यापुर्वीच प्राजक्ता माळी हिने जान्हवी मनचंदा हिला मानहानीची नोटीस पाठवली. त्यामुळे याप्रकरणी जान्हवीला धमकी दिल्याबद्दल भादंवि ५०६ या कलमांतर्गत कलमवाढ करावी असे निर्देश पोलीसांना न्यायाधीश व्ही. व्ही. राव जडेजा यांनी दिले.तर तिला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे समन्सही बजावले आहेत.

काय आहे प्रकरण

एका शो दरम्यान आपल्याला दिलेले कपडे योग्य नसल्याच्या कारणावरून प्राजक्ताने जान्हवीला मारहाण करत शिवीगाळ केली असल्याची तक्रार जान्हवीने केली होती. त्यावेळी संबंधित संभाषणाचा व्हाट्स अपचा स्क्रीनशॉटही व्हायरल करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रार देणार असल्याचं जान्हवीने म्हटल्यावर माझे वडील पोलीस तर काका वकील आहेत मला याने काही फरक पडणार नसल्याचे प्राजक्ताने म्हटल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीही आता जान्हवीनं पुन्हा न्यायालयातही याप्रकरणी याचिका दाखल केली आहे.