कुत्र्याने उडी मारल्यामुळे ढिगारा कोसळून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भटक्या कुत्रयाने उडी मारल्यामुळे प्लायवूडचा ढिगारा अंगावर कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ठाण्यातील शिळफाटा परिसरात गोडाऊनमध्ये ही घटना घडली. रंजू आणि मंजू अशी मृत्यूमुखी पडलेलया अल्पवयीन मुलींची नावे आहेत.

कुत्रा भटकत असताना अचानक त्याने उडी मारली आणि मोठा आवाज झाला. त्याच्या एका उडीमुळे तिथे असलेला प्लायवूडचा ढिगारा खाली कोसळला. प्लायवूड पडल्याने आवाज झाला त्यामुळे काय घडले हे पाहण्यासाठी शेजारी आणि कुटुंबीय तिथे आले. त्यांनी प्लायवूडचा ढिगारा हटवल्यानंतर दोन मुली बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. या मुलींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत दोन सख्ख्या बहिणींनी प्राण सोडले होते. शेजार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार छाती आणि डोक्यावर प्लायवूडचा ढिगारा पडल्यानं गंभीर जखम झाली होती. या दोन बहिणींना कळव्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सध्या या प्रकऱणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.