पुलवामा हल्ल्याचा बदला माझ्या सल्ल्यानेच : ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

चाकण (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत जैश -ए -मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त करण्यात आले. तसेच अनेक दहशतवादी मारले गेले. ही कारवाई माझ्या सल्ल्यानेच झाल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पवार चाकण येथे आले होते. त्यावेळी बोलताना, पुलवामा हल्ल्याबाबत पवारांनी हा मोठा गौफ्यस्फोट केला.

एअर स्ट्राइकबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, पुलवामा हल्ल्यानंतर तातडीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक घेण्यात आली. तेव्हा मी पूर्वी संरक्षण मंत्री असल्याने पहिला प्रश्न मला विचारण्यात आला, त्यावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश भारतीय जवानांना द्या, असा सल्ला मीच दिला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री सितारामण उपस्थित नव्हते, असेही पवारांनी सांगितले.

मोदींवर टीका-

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते, असे सांगत पवारांनी मोदींवर टीकाही केली होती. पुलमावा हल्ल्यानंतर देशात सीमारेषेवर तणाव होता अन् ही ५६ इंचाची छाती यवतमाळमध्ये येऊन बोलत होती, असे म्हणत मोदींना टोलाही लगावला.

एअर स्ट्राईक –

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने एअर स्ट्राईक केला. वायुसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळ १००० हजार किलोचा बॉम्बचा हल्ला करत उद्ध्वस्त केला . यात सुमारे ३०० दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले. सर्जिकल स्ट्राइक-२ मुळे पाकिस्तानला मोठी चपराक बसली आहे.