पोलीस चौकीच्या दारातच आढळला तरुणाचा मृतदेह

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – पेठ बीड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणा-या बार्शी नाका पोलीस चौकीच्या दारात एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी नाका चौकीच्या दारात प्रकाश उर्फ पक्या (वय-२५ रा. बार्शी नाका, बीड) हा तरूण झोपलेला होता. सायंकाळी नागरिकांना प्रकाश चौकीच्या दारात झोपल्याचे दिसले. त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची कोणतीही हालचाल दिसली नाही. त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल आवारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. बार्शी नाका पोलीस चौकीत कोणताच कर्मचारी नसल्याने हा प्रकार सायंकाळी उघडकीस आला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यावर प्रतिक्रीया देताना पोलिसांनी सांगितले कि, आम्हाला दुसरीकडे बंदोबस्त असल्या कारणाने चौकीत कर्मचारी नसल्याचे पोलीस कॉन्स्टेबल आवारे यांनी सांगितले.