१० हजार रुपयाची लाच स्विकारताना वनरक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

आरमोरी (गडचिरोली) : पोलीसनामा ऑनलाईन- रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयाची लाच स्विकारताना वनरक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वनरक्षकाने १५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १० हजार रुपये स्विकारताना अतुल प्रभाकर धात्रक (वय-३४) याला रंगेहाथ पकडण्यात आले.

अतुल धात्रक हा देलोडा बिटमधील मरेगाव उपक्षेत्रात कार्यरत आहे. वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेती वाहतुकीवरील ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी वनरक्षक धात्रक याने १५ हजार रुपये मागितले होते. संबंधित वाहतुकदाराने याबाबतची तक्रार एसीबीकडे केली. तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने आरमोरी येथील जुन्या बसस्थानक परिसरात सापळा रचला. दरम्यान १५ हजारांऐवजी तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार धात्रक याला पैसे घेताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे धात्रक याने १५ दिवसांपूर्वी रेतीची वाहतूक करणारे काही ट्रॅक्टर पकडले होते.

आरोपी धात्रक याच्याविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गडचिरोली एसीबीचे पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलीस हवालदार प्रमोद ढोरे, नत्थू धोटे, नाईक पोलीस शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकेवार, देवेंद्र लोनबले, पोलीस शिपाई महेश कुकुडकार, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सुभाष सालोटकर, सोनी तावाडे, सोनल आत्राम, तुळशिराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार आदींनी केली.

विखे रासपाच्या संपर्कात : महादेव जानकरांचा दावा