स्कूलबसने शाळकरी विद्यार्थ्याला चिरडले

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – स्कूलबसमध्ये चढत असताना तोल गेल्याने विद्यार्थी बसच्या चाकाखाली सापडला. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील खासगी स्मिता ट्रॅव्हल्सच्या स्कूलबसचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यशराज चांदेकर (वय-८) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या भावाने या घटनेची माहिती वडिलांना दिली. अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको केला. ही घटना गुरुवारी दुपारी तुकूम येथील कार्मेल अकॅडमी शाळेसमोर घडली.

बि. जे. एम. कारमेल अकॅडमी या शाळेची दुपारी सव्वादोन वाजता सुटी झाली. उर्जानगर वसाहतीत राहणारे विद्यार्थी शाळेबाहेर पडून स्कूल बसची वाट बघत होते. दुपारी अडीच्या दरम्यान त्यांची बस शाळाजवळील रस्त्यावर आली. त्या रस्त्यालगत वाळूचा ढिगारा टाकलेला होता. या ढिगाऱ्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास अडथळा निर्माण झाला. अशातच यशराज चांदेकर हा विद्यार्थी बसमध्ये चढत असताना तोल जाऊन बसच्या मागील चाकाखाली आला. चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच शाळेत इयत्ता ६ वीत शिकणाऱ्या त्याच्या भावाने याची माहिती आपल्या वडिलांना दिली. या घटनेचे वृत्त पसरताच तिथे मोठी गर्दी झाली. नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.

ही घटना शाळेच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करुन विद्यार्थ्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने मृताच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये तर चंद्रपूर वीज केंद्रानेही २५ लाख आर्थिक मदतीचा धनादेश दिला.