बालिका मृत्यु प्रकरण : विषारी प्राण्याच्या दंशाने मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील 5 वर्षीय बालिकेचा 1 डिसेंबर रोजी झालेला मृत्यू हा लैंगिक अत्याचारामुळे नव्हे, तर विषारी प्राण्याच्या दंशाने झाला आहे, असा वैद्यकीय अहवाल औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे. हा अहवाल आज (दि. 22) श्रीरामपूर तालुका पोलिसांना प्राप्त झाला आहे.

1 डिसेंबर रोजी दुपारी कारेगाव येथील बालिकेचा मृत्यू झाला होता. तिच्या गुप्तांगाला सूज आलेली असल्याने शारीरीक अत्याचारामुळे  तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतु, एका विषारी जातीच्या सापाने दंश केल्यासही गुप्तांगात सूज येते, असे काही डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दुसर्‍या दिवशी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला होता. परंतु, व्हिसेरा राखून ठेवत तपासणीकरिता शरीरातील आवश्यक ते नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामुळे प्राथमिक अहवालात मृत्यूबाबतचा कोणताही निष्कर्ष देण्यात आला नव्हता.

बालिकेच्या आईचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल
मयत बालिकेच्या आईने श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने केलेल्या शारीरिक अत्याचारमुळे ती मयत झाल्याची फिर्याद दिली होती.  त्या बालिकेचा मृत्यू हा विषारी प्राण्याने दंश केल्याने श्‍वासावरोध होऊन झाला आहे, असे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेचसापाने घेतल्या दंशामुळे तिचा मृत्यू झाला, हे उघड झाले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील पाच वर्षीय बालिकेवर शारीरिक अत्याचार झाल्याने मृत्यू झाला, असा आरोप नागरिकांनी केला होता. त्यामुळे श्रीरामपूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा शहरात दाखल झाला होता.

120 जणांकडे केली होती चौकशी
पोलिसांनी घटनेच्या तपासासाठी पाच विशेष पथके नियुक्त केली होती. तपासात पोलिसांनी मयताचे नातेवाईकांसह एकूण 120 जणांची चौकशी केली होती. संशयित व्यक्तींच्या मोबाईलचे सीडीआर, टॉवर लोकेशन तपासण्यात आले होते. घटनास्थळावरचा डम्पडेटा घेण्यात आला होता. तसेच मयताच्या अंगावरील कपड्यांवर रक्त किंवा विर्याचे अंश आढळून आले नव्हते.