कोचिंग क्लासमधील कर्मचाऱ्यानेच लंपास केले २७ लाख

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मालधक्का चौकाजवळ असलेल्या बाकलीवाल ट्युटोरियच्या ऑफिसचे शटर उचकटून आधी काम करणाऱ्या कामगारानेच २७ लाख ४१ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार रविवारी उघडकिस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असून त्यात दोघांचे चित्रिकरण झाले आहे.

वैभव सतीश बाकलीवाल (३७ वर्षे, पिंपळे सौदागर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरज भंडारी (पिंपरी) व जगदिश भंडारी (निगडी) या दोघांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील मालधक्का चौकाजवळ बालकीवाल यांचे क्लासेसचे कार्यालय आहे. गुन्हा दाखल केलेल्या दोघांपैकी एकजण यापुर्वी येथे नोकरीस होता. परंतु काही महिन्यांपुर्वी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. शनिवारी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची जमा झालेली प्रवेश फी जमा करण्यात आली होती. त्याची एकूण २७ लाख ४१ हजार ८३७ रुपयांची रोकड एका सॅक मध्येठेवण्यात आली होती.

दरम्यान शनिवारी रात्री ऑफिसचे शटर बंद करून ठेवण्यात आले होते. त्यावेळी साडे अकरानंतर ऑफिसचे शटर उचकटून ऑफिसमधील २७ लाखांची रोकड लंपास करण्यात आली. रविवारी सकाळी हा प्रकार समोर आला. त्यानंतर समर्थ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तेथे जाऊन सीसीटिव्ही फुटेज तपासले. तेव्हा सुरज भंडारी व जगदिश भंडारी या दोघांनी शटर कटावणीने उचकटून आत प्रवेश करत रोकड लंपास केल्याचे समोर आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन अतकरे करत आहेत.